Tuesday, March 9, 2010

श्री गणेश चतुर्थी ( भाद्रपद शुध्द चतुर्थी )

नारळी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा) - राखी पौर्णिमा (रक्षाबंधन)

समुद्राकाठी जे लोक राहतात ते प्रामुख्याने हा सण साजरा करतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे, वगैरेची या-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून या दिवसापासून समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून अर्पण करतात. काही लोक रुपयाची नाणी बांधतात. कोणी साधा नारळ समुद्रात सोडतात. या दिवशी बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी. भावाने बहिणीचे रक्षण करावे, असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. नवीन यज्ञोपवीत ( जानवे) धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात करावा. बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणे करावा. या दिवशी नारळाच्या ठिपक्यांची रांगोळी काढावी.

नागपंचमी (श्रावण शुध्द पंचमी)

यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवक म्हणजेच श्रावण शुध्द पंचमी (नागपंचमी) तेव्हापासून लोक नागाची पूजा करून लाह्या, दूध देतात. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात. या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नवे घेवून यथासांग पूजा करतात. या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये. विळीने चिरू नये. तळण करू नये. वरील प्रमाणे नाग काढावा किंवा मातीचे दोन नाग आणावेत. पाटावर रांगोळी काढून त्यावर गहू पसरून नाग ठेवावेत. नागाची पूजा करावी.


पूजेचे साहित्य - हळद-कुंकू, फुले, गंध, अक्षता, जोन्धल्याच्या लाह्या, आघाडा, दुर्वा, फुटणे, गेजवस्त्र, दुसऱ्या दिवशी गारुडी लोक नाग घेवून रस्त्याने हिंडत असतात. आपल्या दारापुढे त्याला बोलावून नागाची वरील प्रमाणे पूजा करून दूध पाजावे. पुराणाचे दिंड व शक्य असल्यास एखादा जुना कपडा गारुड्याला द्यावा. लिंबू , भाजी वैगरे चीरण्याचे काम आदल्या दिवशी रात्रीच करावे. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वर येईल त्यादिवशी भिंतीवर लावावा व त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी. जिवतीला आघाडा, दुर्वा, फुले एकत्र करून त्यांची माळ करून घालावी. गौरी गणपती विसर्जनानंतर हळद-कुंकू वाहून अक्षता टाकून जिवतीचा कागद काढावा.

या दिवशीचा स्वयंपाक - पुरणाची दिंडे किंवा साखर खोबऱ्याची दिंडे करावीत. बाकीचे पदार्थ इतर सानाप्रमाणेच करावेत.
नावानागांची नावे - १) अनंत. २) वासुकी, ३) शेष, ४) पद्मनाभ, ५) तक्षक, ६) कालीय, ७) शंखापाल, ८) कंषांल, ९) धृतराष्ट्र

गुरु पौर्णिमा ( आषाढ शुध्द पौर्णिमा)

ॐ नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपानेत्र
येन व्रया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः १
या दिवशी वरीलप्रमाणे महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. महर्षी व्यास जगाचे आद्यगुरु होते. या दिवशी जागतगुरु व्यासांची पूजा करतात. थोर गुरुजनांना आदराने वंदन करतात. गुरुजानाविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. गुरु आपणास नवी दृष्टी देतात. योग्य पध्दतीने जाणतेपणाने कष्ट करण्याक शिकवितात. एकाग्रता, सहनशीलता, त्याग, आज्ञाधारकता वैगरे सदगुण सदगुरुमुळेच आपणास प्राप्त होतात. अशा गुरूविषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा विशेष दिन आहे म्हणूनच व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून मानतात. आपल्या गुरुबद्दलची निष्ठा सतत जागरूक ठेवण्याचा, गुरुचे स्मरण करण्याचा आणि आपले जीवन सुधारण्याचा हा मंगल दिन आहे. या दिवशी रुद्राभिषेक करावा. गुरूला वस्त्र व दक्षिणा द्यावी. तसे न जमल्यास उपरणे, फेटा काहीतरी द्यावे.

पुजेची तयारी - पंचामृत व नेहमीप्रमाणे इतर पुजेची तयारी करावी. या दिवशी रात्री भजन-कीर्तन, कथा यासारखे कार्यक्रम करावेत. शेवटी गुरूची आरती म्हणावी.

गुढी पाडवा

श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करून, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या आयोध्येला परत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढ्या, तोरणे उभारून आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.
कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करण्यास हा दिवस शुभ समजतात. साडेतीन मुहूर्त आहे. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो व नवे पंचांगही सुरु होते. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवशी झाली.
घराच्या पुढील अंगणातील जमीन गाईच्या शेणाने सारवून पाच पांडव तयार करून भोवती रांगोळी काढावी. त्या ठिकाणी गुढी उभारावी. गुढीच्या मुळाशी षोडशोपचारे पूजा करावी.
गुढी उभारण्यापूर्वी गुढीला (काठीला) तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. हळद कुंकू वाहावे. गुढी करिता पितळेचे अथवा चांदीचे भांडे, कडूलिंबाचा डहाळा , साखरेची गाठी, जरीचा खण, कापड अथवा पातळ, फुलांची माळ व काठी एवढे साहित्य घेवून गुढी उभारावी. गुढीला हळदी कुंकू वहावे. दारावर आंब्याच्या डहाळीची अगर पानांची पूजा करावी. गुढी सायंकाळी चार वाजणेचे पुढे केव्हाही उतरावी. गावात रामाचे देऊळ असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी. गुढी उतरण्यापूर्वी हळद-कुंकू, अक्षता वाहून नंतर उतरावी.
या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पती-पूजन (सरस्वतीपूजन) असते.

पाटीपूजनाची तयारी - पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात. हळद-कुंकू, अक्षता, पैसे, सुपारी, फुले, गूळ-खोबरे, उदबत्ती, असल्यास एखादे फळ वैगरे.
या दिवशी मुख्यत्वे करून पुरणपोळी, पुरणाची आमटी, टाळण, गव्हल्याची खीर किंवा शेवयाची खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच करावा. पुरणपोळी करणे शक्य नसल्यास निदान मुठीचे पुरण तरी करावे. शेवग्याच्या शेंगांची कधी करावी.
कडूलिंबाचे चूर्ण - मीठ, हिंग, जिरे, गूळ, किंवा साखर, ओवा, मिरे यांच्यासह पुष्पसाहित कडूलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून जेवण्यास बसण्यापूर्वी खावे व मग जेवावे. आरोग्यास चांगले असते.