श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करून, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या आयोध्येला परत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढ्या, तोरणे उभारून आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.
कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करण्यास हा दिवस शुभ समजतात. साडेतीन मुहूर्त आहे. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो व नवे पंचांगही सुरु होते. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवशी झाली.
घराच्या पुढील अंगणातील जमीन गाईच्या शेणाने सारवून पाच पांडव तयार करून भोवती रांगोळी काढावी. त्या ठिकाणी गुढी उभारावी. गुढीच्या मुळाशी षोडशोपचारे पूजा करावी.
गुढी उभारण्यापूर्वी गुढीला (काठीला) तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. हळद कुंकू वाहावे. गुढी करिता पितळेचे अथवा चांदीचे भांडे, कडूलिंबाचा डहाळा , साखरेची गाठी, जरीचा खण, कापड अथवा पातळ, फुलांची माळ व काठी एवढे साहित्य घेवून गुढी उभारावी. गुढीला हळदी कुंकू वहावे. दारावर आंब्याच्या डहाळीची अगर पानांची पूजा करावी. गुढी सायंकाळी चार वाजणेचे पुढे केव्हाही उतरावी. गावात रामाचे देऊळ असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी. गुढी उतरण्यापूर्वी हळद-कुंकू, अक्षता वाहून नंतर उतरावी.
या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पती-पूजन (सरस्वतीपूजन) असते.
पाटीपूजनाची तयारी - पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात. हळद-कुंकू, अक्षता, पैसे, सुपारी, फुले, गूळ-खोबरे, उदबत्ती, असल्यास एखादे फळ वैगरे.
या दिवशी मुख्यत्वे करून पुरणपोळी, पुरणाची आमटी, टाळण, गव्हल्याची खीर किंवा शेवयाची खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच करावा. पुरणपोळी करणे शक्य नसल्यास निदान मुठीचे पुरण तरी करावे. शेवग्याच्या शेंगांची कधी करावी.
कडूलिंबाचे चूर्ण - मीठ, हिंग, जिरे, गूळ, किंवा साखर, ओवा, मिरे यांच्यासह पुष्पसाहित कडूलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून जेवण्यास बसण्यापूर्वी खावे व मग जेवावे. आरोग्यास चांगले असते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment